About Temple

श्री विठ्ठल रुखुमाई मंदिर,बोरिवली ,गोराई-२ माहिती

मुंबईच्या बोरीवली विभागात पश्चिमेच्या दिशेला एस्सेल वर्ल्ड येथील पैगोडाच्या बाजुला सुंदर असे नयनरम्य गोराई या वसाहतीचे (म्हाडा) शहर वसलेले आहे. सन १९९२-९३ मध्ये अल्प दरातील उत्पन्न असलेल्या गटातील लोकांसाठी म्हाडा मार्फत ह्या वसाहतीची स्थापना झाली. त्यानंतर लालबाग-परळ तसेच मुंबई मधील बरेच रहिवाशी हे गोराई व चारकोप येथे स्थलांतरित झाले . त्यावेळी कोणत्याही सुख-सुविधा या ठिकाणी नव्हत्या. परंतु लोकांनी या सर्व गोष्टीवर मात केली आणि सुंदर असा याठिकाणी विभाग तयार झाला. शुद्ध हवा व पर्यावरणीय दृष्ट्या हा भाग संपन्न असून सर्व जाती धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने

राहतात .तसेच सर्व सण व उत्सव साजरे केले जातात.या विभागामध्ये बरेच उद्याने आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वेग- वेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी उत्तमरित्या राबविल्या जातात.

परिणामी येथे वेगवेगळ्या देवतांची मंदिरे उभे राहू लागली .महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेले पंढरपुरचे श्री विठ्ठल रुखमाई मंदिर . सर्व भाविक/वारकरी आपल्या श्रद्धेने आषाढी व कार्तिकी एकादशीला दिंडी पताका घेऊन पायीं चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात.तशी

गोराई -चारकोप विभागात वेगवेगळ्या देव देवतांची मंदिरे आहेत. परंतु बोरिवली गोराई येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर नव्हते.पण काही लोकांनी एकत्र येऊन आर.एस.सी.२८ आणि २७|२९ या मुख्य जोड रस्त्यावर श्री विठ्ठल रखुमाई मंदिराची स्थापना केली.या मंदिराची व्यवस्था कै.दिगंबर मारुती तावडे आणि कै. सुहास दत्तात्रय रावराणे हे पहात होते . त्यानंतर मी महेश लक्ष्मण नर आर.एस.सी.२८ येथे रहात असताना मंडळातील व्यवस्थापन पहात असलेले सर्व सहकारी यांनी मला मंदिराची व्यवस्था पाहण्यास सांगितले.

त्यावेळी मंदिर बांधलेले नव्हते व अधिकृत नोंदणी देखील झालेली नव्हती. मी सर्व व्यवस्था रीतसर करून आर.एस.सी.२८. मधील रहिवाशी तसेच गोराईतील लोकांच्या सहभागातून सन २००० साली सुसज्ज अशा मंदिराची स्थापना करण्यात आली आणि धर्मायुक्त यांच्या मार्फत २००५ साली श्री विठ्ठल रखुमाई चरीटेबल ट्रस्ट ची अधिकृत नोंदणी करण्यात आली .

मा. उच्च न्यायालयीन आदेशानुसार सन २००६-०७ साली महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळांवर तोडण्याची कारवाई करण्यात आली होती. यात आपलेही मंदिर होते . मी ट्रस्टच्यावतीने कारवाई थांबविण्याकरिता मा.उच्च न्यायालयात गेलो होतो. परंतु याठिकाणी मला अपयश आले होते. तमाम गोराईकरांचे श्रद्धास्थान असलेले एकमेव मंदिर श्री विठ्ठल मंदिर तोडू नये म्हणून खूप मोठ्या प्रमाणात जमावांनी तणाव निर्माण केला होता. त्यानंतर सर्व रहिवाशांच्या भावनांचा विचार करता रस्त्याच्या कडेला असलेल्या रिलायन्स इलेक्ट्रिसिटी केबिन च्या बाजूला नविन श्री विठ्ठल मंदिर उभारण्यात आले . मंदिराच्या कामकाजात बरेच अडथळे व अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु श्री विठ्ठल रखुमाईची कृपा असल्यामुळे या सर्व गोष्टीवर मात होत गेली आणि खऱ्या अर्थाने मंदिर नावा रुपाला आले . गोराईतील रस्ते महानगर पालिकेच्या माध्यमातून सन २०२२-२३ सा

कोन्क्रिटीकरण करून नूतनीकरण करण्याचे ठरविण्यात आले असता रस्त्याला नाल्यांना कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या जबाबदारीने नाले बनविण्यासाठी जागा रिकामी करून मंदिराच्या बनवलेल्या रचनेला (strucure) हलवावे लागले होते म्हणून सन २०२३ साली मंदिराचे पुन्हा एकदा जीर्णोद्धार करण्याचे ठरविण्यात आले. गोराईतील रहिवाशी ,भक्त , हितचिंतक ,देणगीदारांची मोलाची मदत मिळाली . पुन्हा एकदा प्रशस्त असे मंदिर उभारण्यात आले .सर्व भक्तांचे विश्र्वस्त यांच्या वतीने मन:पूर्वक आभार...! आता २०२४ साल चे वर्ष चालू असून पुढील वर्षी सन २०२५ साली मंदिराला २५ वर्षे पूर्ण होत आहेत . आम्हा गोराईतील रहिवाशी ,भक्त , हितचिंतक ,देणगीदारांना याचा सार्थ अभिमान आहे. मंदिरामध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल चालू असते . महिलासाठी हळदी-कुंकू महिला -दिन , गुढीपाडवा, होलिकोत्सव, धुलीवंदन ,श्री कृष्णाष्टमी, दहीहंडी, नवरात्री हे सण साजरे केले जातात . आषाढी व कार्तिकी एकादशीच्या दिवशी पहाटे

अभिषेक झाल्यापासुन भाविकांच्या लांबच लांब रांगा असतात . भजनाचा कार्यक्रम असतो. द्वादशी दिवशी होमहवन,श्री सत्यनारायणाची महापूजा ,तसेच महाप्रसाद (भंडारा) याचे आयोजन केले जाते. विभागातील दानशूर , हितचिंतक व राजकीय भाविक मंदिराला भेट देतात.

मंदिरामार्फत मोफत वैद्यकीय आरोग्य , डोळे , दंत चिकित्सा तपासणी शिबिराचे आयोजन केले. जाते. महानगरपालिकेच्या माध्यमातून लहान मुलांसाठी मोफत पल्स पोलीओ डोस देणे , पोष्ट खात्यातर्फे विमा कार्ड काढुन देणे, मुलांना मोफत वह्या वाटप , गोराईतील पदयात्रा यांचे देखील स्वागत केले जाते . आम्हाला यासाठी महिला सेवेकरी सदस्या यांचे फार महत्वाचे योगदान लाभते. सन २०२३ या वर्षी आमच्या ज्येष्ठ महिला सेवेकरी श्रीमती ललिता लक्ष्मण नर यांनी महिलांचा लेझीमचा कार्यक्रम घेतला होता. हा कार्यक्रम खास आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरला होता. तसेच गोराईतील नवोदित गायकांसाठी कराओके मराठी गीत संगिताचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. आपल्या या मंदिरामध्ये गोराईतील विविध शाळेचे विध्यार्थी आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी/द्वादशी दिवशी लहान- मोठ्या विध्यार्थ्यांना घेऊन वेशभूषेत दिंड्या पताका घेऊन पालखी मोठ्या प्रमाणात काढत असतात . विशेष सुविद्या प्रचारक माध्यमिक शाळा , सेंट रॉक्स, व नालंदा शाळेतील शिक्षकांचा आणि बाळ गोपाळांचा पालखी सोहळ्यात उत्स्फूर्त असा सहभाग असतो.

मंदिरात दररोज सकाळी ब्राम्हणाच्या हस्ते पुजा केली जाते. दर बुधवारी व एकादशी ला संध्याकाळी आरती करण्यात येते .त्यानंतर प्रसादाचे वाटप होते. दर एकादशीच्या दिवशी वारकरी भजन मंडळ यांच्या मार्फत भजन करण्यात येते.सन २०२५ हे वर्ष रौप्य वर्षे असल्यामुळे मंदिरातर्फे कॅलेंडर छापण्यात येणार आहेत. तसेच भरपूर उपक्रम या मंदिराच्या वतीने राबविण्यात येतात.मंदिराच्या माध्यमातून वेबसाईट चालू करण्यात येणार असून त्यानिमित्ताने आपल्या मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमाचे फोटो तसेच मंदिराची सर्व माहिती अपलोड करण्यात येणार आहे .सोशल मिडीयामध्ये विठ्ठल मंदिराच्या नावे फेशबुक पेज आहे . त्यामध्ये मंदिराचे LIVE कार्यक्रम दाखविले जातात. मला या मंदिराबाबतची जितकी माहिती आठवणी व्यक्त करेल तितक्या कमीच आहेत . तूर्तास मी इथेच थांबतो .आपण मंदिराला एकदा भेट द्या . आपल्या काही सूचना असल्यास कृपया मला कळवाव्या .

Our Schedule

7:00 am - Temple Open for Darshan
9:30 am - Main Aarti
12:15 pm - Naivaidya
01:00 pm to 04:00pm - Temple Close
8pm - Aarti (Wed & All Akadashi)
9:00 pm - Temple Close

About Us

मुंबईच्या बोरीवली विभागात पश्चिमेच्या दिशेला एस्सेल वर्ल्ड येथील पैगोडाच्या बाजुला सुंदर असे नयनरम्य गोराई या वसाहतीचे (म्हाडा) शहर वसलेले आहे. सन १९९२-९३ मध्ये अल्प दरातील उत्पन्न असलेल्या गटातील लोकांसाठी म्हाडा मार्फत ह्या वसाहतीची स्थापना झाली. त्यानंतर लालबाग-परळ तसेच मुंबई मधील बरेच रहिवाशी हे गोराई व चारकोप येथे स्थलांतरित झाले .

Help Support

  • RSC 28, Opp Samadhan Soc, Near Addharika Bhavan, Gorai-2, Borivali (West) Mumbai.

  • +91 8108151872, 8452944747